मुंबई | येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील महत्वाचा नेता पुढील दोन दिवसांत महायुतीमध्ये येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच तसं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असाही त्यांनी दावा केला आहे.
महायुतीमध्ये मोठा नेता येणार असल्याचे संकेत यावेळी शिरसाट यांनी दिले आहेत. भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांच्यावर बोलताना, आता वायकर, प्रभू, सुनिल शिंदे आणि माजी महापौर यांच्यापैकी कोण येतंय? हे दोन दिवसांत कळेल असंही म्हटलं होतं. मागील दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं बोललं होतं.
आमचा बॅास जे करेल ते योग्यच
अशोक चव्हाण महायुतीमध्ये आल्यानं आमची ताकद वाढली, हे खरं आहे. पण थोडं चुकचुकल्यासारखं वाटणार आहे. कारण जे मिळणार होतं, ते आता थोडं मिळणार आहे. त्यामुळे चुकचुकल्यासारखं वाटरणारच ना, असे संजय शिरसाट म्हणाले. आम्हाला काळजी कऱायची गरज नाही. आमचा बॅास जे करेल ते योग्यच करेल, आमची बार्गेनिंग पॅावर कमी होणार नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले.
अनेक नेते भाजपच्या वाटेवर खासदार धनंजय महाडिकांनीही केला दावा
कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागलंय. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक म्हणाले.