नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत एकीकडे विजयाची गॅरन्टी नसतानाही अनेकजण तिकीट मिळण्यासाठी थेट दिल्ली दौरा करत आहेत अनेकजण पक्षश्रेष्ठींच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गुजरातमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केलीय…दोन्ही उमेदवारांनी पक्षाला तिकीट परत केलं आहे. हे दोन उमेदवार नेमके कोण आहेत? त्यांनी तिकीट पुन्हा देण्याचं कारण काय? याविषयीची माहिती जाणून घ्या या व्हिडीओतून…
लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्षात तिकिटांसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. अनेकजण तिकीट मिळण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत तर गुजरातमध्ये भलताच प्रकार पाहायला मिळाला. गुजरातमधील वडोदरा आणि साबरकांठा या दोन मतदारसंघात भाजपचं तिकीट जाहीर झालेल्या उमेदवारांनी माघार घेतली आहे.
वडोदऱ्याचे विद्यमान खासदार रंजनबेन भट्ट आणि साबरकांठाहून भीकाजी ठाकुर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे पक्षाचं सलग तिसऱ्यांदा तिकीट मिळणाऱ्या भट्ट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. २०१४ साली वडोदरा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले मात्र अलाहाबादमधूनही ते निवडून आल्यावर त्यांनी वडोदरा मधून राजीनामा दिला त्यानंतर याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत रंजनबेन भट्ट या लोकसभेवर निवडून गेल्या तर भीकाजी यांच्या जातीवरून वाद सुरु आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीपासून लांब राहण पसंत केलं असल्याचे सांगितलं जातं आहे.
भिकाजी ठाकूर यांना स्थानिकांमध्ये भीकाजी डामोर या नावाने ओळखलं जात. तिकीट मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर हाच मुद्दा उपस्थित झाला होता. दोन वेळचे खासदार दीपसिंह राठोड यांचे तिकीट कापून भीकाजी यांना इथून संधी देण्यात आली होती. गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांपैकी भाजपने 22 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये रंजन भट्ट यांच्यासह चार महिलांच्या नावांचा समावेश आहे. भट्ट यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता केवळ 3 महिला उमेदवार राहिल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्येच त्यांच्या दोन उमेदवारांनी त्यांची साथ न देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. एकीकडे ४०० पारचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे नेते लोकसभेसाठी मैदानात उतरले आहे तर दुसरीकडे मात्र भाजपमधून जाहीर झालेले उमेदवार माघार घेत आहेत त्यामुळे भाजपच्या गोटात नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न पडतो.