PROCESS IS MORE IMPORTANT THAN THE REULT. RESULT IS A BIPRODUCT OF THE PROCESS. हे वाक्य आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचं. धोनीच्या मते सामन्याच्या निकालाकडे लक्ष न देता आपल्या हातात असणाऱ्या कृती योग्य पद्धतीनं केल्या तर आपल्याला अपेक्षित निकाल मिळतोच. पण नेमकं धोनीच्या या विधानाला विरोध करणारं एक वक्तव्य नुकतंच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलंय. त्यामुळं आता पुन्हा एकदा गौतम गंभीर विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा संघर्ष समोर आलाय.
क्रिकेट हा भारतात सर्वात जास्त पाहिला जाणारा खेळ आहे. अनेकदा क्रिकेट हा कखेळ नाही तर भावना आहे असं सांगितलं जातं. क्रिकेटच्या एका सामन्यात मिळालेला विजय हा चाहत्यांना उत्सव साजरा करण्याचं कारण ठरतो तर एक पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागतो. अशा परिस्थितीत भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांच्या मोठ्या कालखंडात एकही मोठा सामना जिंकून भारतीय चाहत्यांना आनंद देता आला नाही. प्रत्येक वेळी आपला संघ आयसीसी टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि नॉक आऊट्समध्ये जाऊन पराभव स्विकारतो. अशा परिस्थितीत चाहत्यांना एका खेळाडूची राहून राहून आठवण येते. तो खेळाडू आहे महेंद्रसिंह धोनी. धोनीनं भारताला 2007 सालचा टी20 वर्ल्डकप, 2011 सालचा वनडे वर्ल्डकप आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी असे 3 चषक जिंकवून दिले. मात्र, धोनीनंतर एकाही स्पर्धेत ट्रॉफी जिंकण्याची किमया कोणत्याही कर्णदाराला करता आलेली नाही. अशा परिस्थितीत तीनही ट्रपॉफईज जिंकण्याचं सर्वाधिक श्रेय धोनीला दिलं जातं. मात्र, यावरूनच अनेकदा गंभीरनं स्पष्ट विधानं करत वर्ल्डकप विजयाचं श्रेय एकट्या धोनीचं नाही असं म्हंटलंय. त्यामुळंच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या दोन महान खेळाडूंमधला संघर्ष अनेकदा समोर आलाय. मात्र, आता पुन्हा एकदा या संघर्षाला मोठं वळण मिळालंय.
क्रिकेटमध्ये निकालाचा विचार करण्यापेक्षा प्रोसेस फॉलो करणं गरजेचं असतं. योग्य प्रोसेस फॉलो केली तर अपेक्षित निकाल मिळतो असं धोनीनं वारंवार मुलाखतींमधून सांगितलंय. मात्र, या विधानाला विरोध करणारं वक्तव्य सध्या गंभीरनं केलंय… माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. प्रक्रिया या शब्दावर आणि योग्य प्रक्रिया करत राहा, निकाल आपोआप मिळेल, या वाक्यावर अजिबात विश्वास नाही. माझ्यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. कारण लोक संघाला जिंकताना पाहायला आलेले असतात. असं विधान गौतम गंभीरनं केलंय. यावरून आता सोशल मीडियावर धोनी आणि गंभीरच्या चाहत्यांमध्ये राडा सुरू झालाय.
पण दोघांच्या भूमिकेत नेमका फरक काय. तर क्रिकेटमध्ये योग्य वेली योग्य निर्णय घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये बॉटिंग, बॉलिंग, फिल्डिंक किंवा कॅप्टन्सी प्रत्येक क्षेत्रात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन कामगिरी करावी लागते. अशा परिस्थितीत खेळाडूंवर अनेकदा हाय प्रेशर सामन्यात जिंकण्याचा दबाव असतो आणि त्या दबावाखाली खेळाडू चूक करत असतात. अशाच प्रेशरमुळं आपण 2019चा वनडे वर्ल्डकप, 2022चा टी 20 वर्ल्डकप आणि 2023चा वनडे वर्ल्डकप आगदी नॉक आऊटमध्ये जाऊन हरलो. या तीनही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकण्याचं प्रेशर न घेता छोट्या छोट्या गोष्टी बरोबर केल्या असत्या तर निकाल वेगळा असता. मात्र, असं असलं तरीही गंभीरनं सांगितल्या प्रमाणं संघाचा विजय हा शेवटी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. जेव्हा भारतीय संघ एखादा हाय प्रेशर सामना जिंकतो त्यावेळी संघानं फॉलो केलेली प्रोसेस कुणीही लक्षात ठेवत नाही आणि जेव्हा आपण एखादा सामना हरतो त्यावेळी खेळाडूंचं कुठं चुकलंय हे शोधत बसतो. हे सुद्धा तितकंच खरं. त्यामुळं धोनी असो वा गंभीर दोघांनीही केलेली विधानं ही दिसताना विरोधाभासी वाटत असली तरीही खेळाडूंसाठी तितकीच महत्त्वाची आहेत असं म्हणावं लागतं.