महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांत दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. अशीच काहीशी फूट 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये पडणार असल्याचं भाकित काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठी फूट पडणार असल्याचं चित्र आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये भूकंप येईल, असा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींच्या रायबरेली येथील उमेदवारीवरुन हल्ला चढवला. याबाबत बोलताना कृष्णम म्हणाले की, राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांच्याविरोधात षड्यंत्र केलं जातंय. त्यामुळे चार जूननंतर काँग्रेसमध्ये एक मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात संघर्, होईल असा दावाही कृष्णम यांनी केला आहे. एक काँग्रेस राहुल गांधींची असेल अन् एक काँग्रेस प्रियांका गांधींची असेल, असा दावा प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ज्वालामुखी धगधगतोय. सगळ्या षड्यंत्रासंबंधी प्रियांका गांधींना माहिती आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींच्या अमेठीऐवजी रायबरेली येथून लढण्याच्या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हटलं आहे. जेव्हा राजाच मैदान सोडून पळून जातो तेव्हा सैन्य पराभव मान्य करत असतं. आता बघा काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जातील. असं म्हणत कृष्णम यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधलाय. राहुल गांधींनी हेही माहिती नसेल की द्वारका कुठे आहे? द्वारकाधीश कोण आहेत? त्यांना केवळ दिल्लीतली द्वारिका माहिती आहे. असं म्हणत कृष्णम यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही दिलंय.
कोण आहेत आचार्य प्रमोद कृष्णम?
- 4 जानेवारी 1965 रोजी बिहारमधील ब्राह्मण कुटुंबात कृष्णम यांचा जन्म झाला.
- पुढे त्यांनी संभलमध्ये श्री कल्की फाउंडेशनची स्थापना केली आणि सध्या ते कल्की धामचे पीठाधीश्वर आहेत.
- राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला कृष्णम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील संभलमधून लोकसभा निवडणूक लढवली. परंतु त्या जागेवरून त्यांचा पराभव झाला.
- कृष्णम यापूर्वी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सल्लागार समितीचा एक भाग होते, जी प्रियांका गांधी यांना पक्षाच्या यूपी प्रभारी म्हणून त्यांच्या भूमिकेत मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.
- कृष्णम यांच्यावर 2024च्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. सोबतंच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
- काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कृष्णम भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.