सध्या सगळीकडे निवडणुकीचा प्रचार रंगात आल्याचं पहायला मिळतंय. मात्र, महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. कारण ठरतेय ती शरद पवार आणि अजित पवार यांच्यात असलेली अघोषित लढत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं दोन्ही पक्षांमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. अशातंच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा प्रचार करत असताना शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी थेट अजित पवारांना ओपन चॅलेंज दिलंय. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर हे नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना संबोधित केलं. तेव्हा बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डाग.
भाजपनं आमचं कुटुंब फोडलं. आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण शरद पवारसाहेबांनी राज्यात 54 सभा घेतल्या. अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर भाजपच्या माजी खासदारांना अर्थात किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तिसऱ्यांदा खासदार करायचं आहे. ही निवडणूक आपण सर्व भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केलं? सामन्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत, असंही रोहित पवार म्हणाले. विशेष म्हणजे बोलत असताना रोहित पवारांनी पुन्हा एकदा थेट अजित पवारांवर सडकून टीका केली. या टीकेला आता अजित पवार काय उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.