देशात लोकसभा निवडणूक जवळपास संपत आली आहे.आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते ४ जून कडे.निकाल जाहीर होण्याआधी राजकीय विश्लेषक कुणाला किती जागा मिळणार याबाबत अनेक भाकितं करत आहेत.प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भविष्यवाणी नंतर आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देखील लोकसभा निवडणुकीसंदर्भात जारी केलेल्या त्यांच्या अंतिम भाकीतामध्ये NDA ला बहुमत मिळणार की नाही? याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. यासह काँग्रेस, इंडिया आघाडीचा ही आकडा सांगितला आहे.यादव यांनी नेमकं काय गणित मांडलं आहे.हे आपण या व्हिडिओतून पाहू.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी पार पडलं.या टप्प्यातील मतदानापूर्वीच राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आले..सहाव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी लोकसभा निवडणुकीबाबतचं त्यांचं अंतिम भाकीत म्हणजेच या निवडणुकांबाबतचं त्यांनी अंतिम आकलन दिलं आहे. यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी किती जागा जिंकणार आहे आणि देशात कोणाचे सरकार बनणार आहे? याबाबत दावा केला आहे. उत्तर प्रदेशबाबतही पुन्हा एकदा त्यांनी आपला अंदाज वर्तवला आहे.योगेंद्र यादव यांच्या मतानुसार, लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० ते २६० जागा मिळतील तसेच भाजपच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत ३५ ते ४५ जागा मिळतील.योगेंद्र यादव म्हणतात की भाजप यावेळी २७२ जागांच्या खाली जाऊ शकतो. भाजपला २५० पेक्षा कमी जागा मिळू शकतात. भाजपचा ४०० पार करण्याचा नारा खोटा असल्याचं सिद्ध झालं असून या निवडणुकीत भाजप ३०० जागाही जिंकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस ८५ ते १०० जागा जिंकू शकते. इंडिया आघाडीच्या इतर पक्षांबाबत योगेंद्र यादव म्हणतात की ते सर्व १२० ते १३५ इतक्या जागा काबीज करू शकतात. काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष मिळून विरोधी आघाडीला २०५ ते २३५ जागा मिळू शकतात. असा योगेंद्र यादव यांचा दावा आहे.प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे दावे परस्पर विरुद्ध आहेत. प्रशांत किशोर यांच्या प्रमाणे योगेंद्र यादव ही म्हणतात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवेल पण भाजपा किती जागा जिंकणार? या बद्दल त्यांचा अंदाज वेगळा आहे. प्रशांत किशोर दावा करतात की भाजप ३०० जागा जिंकेल तर योगेंद्र यादव यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलेलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात लोकांच्या मनात फार राग नाहीय असं प्रशांत किशोर यांचं मत आहे. पण स्वबळावर भाजपाला ३७० पर्यंत पोहोचण अशक्य असल्याचा त्यांचा अंदाज आहे. तर जे जाणून-बुजून लपवलं जात आहे. सत्य हे आहे की या लोकसभा निवडणुकीनं रोख बदलला आहे. भारतीय जनता पक्षाला यंदा बहुमत मिळणार नाही, असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे.भाजपाप्रमाणे संपूर्ण एनडीएही बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा कमी कामगिरी करू शकेल, असं योगेंद्र यादव यांचं मत आहे. कर्नाटकमध्ये २८ लोकसभा जागांपैकी २६ एनडीएकडे आहेत. पण तिथे त्यांना किमान १० जागांचं नुकसान होईल, असं त्यांचं मत आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून ५१ पैकी ५१ जागा एनडीएकडे आहेत. पण दोन्ही राज्यांमध्ये मिळून किमान १० जागांवर एनडीएचं नुकसान होईल, असं ही ते म्हणालेत.
दरम्यान “हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या सगळ्या राज्यांत मिळून एनडीएचं किमान १० जागांचं नुकसान होईल, तर छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेश मिळून १० जागांचं नुकसान होईल”, असं गणित यादव यांनी मांडलं आहे.उत्तर प्रदेश, उत्तराखंड मिळून ६९ जागा एनडीएकडे आहेत. पण त्यात किमान १५ जागा एनडीए गमावेल. शिवाय, बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर एनडीए आहे. पण तिथेही एनडीएचं किमान १५ जागांचं नुकसान होईल. पूर्वेकडे पश्चिम बंगाल, पूर्ण नॉर्थ-इस्ट आणि इतर केंद्रशासित प्रदेश मिळून किमान १० जागांचं एनडीएचं नुकसान होईल”असा ही यादव यांचा दावा आहे..सर्व राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाला एकूण ७५ जागांचा फटका बसू शकतो, असं योगेंद्र यादव यांना वाटतंय. तर मित्रपक्षांसह एनडीएच्या तब्बल १०० जागा कमी होऊ शकतील, असं ही ते म्हणाले.दरम्यान, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये भाजपला एकूण १५ जागांचा फायदा होईल. मात्र, इतर ठिकाणी होणाऱ्या नुकसानामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता त्यांना वाटते.या सर्व आकडेमोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला ६५ जागांचं नुकसान तर मित्रपक्षांना १५ जागांचं नुकसान होईल. असा यादव यांचा दावा आहे.महाराष्ट्राबाबत ही त्यांनी आपला अंदाज वर्वतला आहे.त्यांच्या मते, महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत भाजपला युतीमध्ये असताना ४२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने २८ जागा लढल्या आहेत. तर मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ५ जागी निवडणूक लढवली आहे. याठिकाणी भाजप आणि मित्रपक्षाचं जवळपास २० जागांचं नुकसान होताना दिसतं.याचा अर्थ महायुतीला याठिकाणी २२ जागा मिळतील तर महाविकास आघाडीला २६ जागा मिळतील अशी शक्यता त्यांनी वर्वतली आहे.तर भाजपने गेल्यावेळी २३ जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी त्या ५ ने कमी होऊन १८ जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे.. येत्या काळात बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली व हरियाणामध्ये मोठा फेरबदल झाला तर इंडिया आघाडीदेखील बहुमतानजीक पोहोचू शकते असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे..