देशात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते ४ जूनच्या निकालाकडे. त्याआधी अनेक संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. एक्झिट पोल नुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असा दावा करण्यात आला आहे. भाजपाप्रणित एनडीएला या निवडणुकीत ३०० ते ३७० जागा मिळतील असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्समधून व्यक्त करण्यात आला आहे. यावर पोल्समधील दावे फसवे असल्याचा सूर विरोधी पक्षांनी आळवला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोल्सवर प्रतिक्रिया देताना ‘संधीसाधू’ आघाडी इंडिया जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी ठरली, असं वक्तव्य केलं आहे.एक्झिट पोल्सवरील पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “प्रसारमाध्यमांवर दाखवले जातायत ते एक्झिट पोल्स नाहीत, ते मोदी मीडिया पोल्स आहेत. ते सगळं मोदींचं स्वप्नरंजन दाखवत आहेत. तुम्ही सिद्धू मूसेवालाचं २९५ हे गाणं ऐकलंय का? आमच्या इंडिया आघाडीच्या तेवढ्या म्हणजेच २९५ जागा येतील.” आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील या एक्झिट पोल्सवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी सर्व एक्झिट पोल्स पाहून एक्स वर एक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “पुढच्या वेळी निवडणुका आणि राजकारणाचा विषय निघेल तेव्हा समाजमाध्यमांवरील तोतया पत्रकार, बोलघेवडे राजकारणी आणि स्वयंघोषित तज्ज्ञ, राजकीय विश्लेषकांच्या फालतू चर्चा आणि विश्लेषण पाहण्यात वेळ वाया घालवू नका.”एक्झिट पोलआधीच प्रशांत किशोर यांनी निकालाचा अंदाज वर्तवला होता. २०१९ पेक्षाही यंदा भाजपाला अधिक जागा मिळतील”, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. “२०१९ पेक्षाही थोड्या फरकाने भाजपाच्या जागा वाढलेल्या असतील”, असं ते म्हणाले होते. पण एक्झिट पोलवर केलेल्या टिपण्णीबाबत प्रशांत किशोर यांचा रोख नेमका कुणावर NDA की INDIA असा सवाल उपस्थित होतो.