लोकसभा निवडणूकीनंतर आता 24 जून पासून 18 व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. लोकसभेमध्ये हंगामी अध्यक्ष पदाच्या वादानंतर लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी देखील निवडणूक होणार आहे. आतापर्यंत एकमताने लोकसभा अध्यक्षांची निवड केली जात होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाही. पण 18व्या लोकसभेमध्ये एनडीए कडून ओम बिर्ला आणि त्यांच्या विरोधात इंडिया आघाडी कडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.पण लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्त्वाचं का आहे? या पदासाठी इतकी रस्सीखेच का सुरु आहे? असे प्रश्न अनेकांना पडलेले असतील. याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
भाजपचे खासदार ओम बिर्ला 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. पण आधीच्या लोकसभा अध्यक्षांचा कार्यकाळ नवीन लोकसभेच्या पहिल्या सत्रापर्यंतच असतो. म्हणूनच 18 व्या लोकसभेचं कामकाज सुरू होताना सगळ्यात आधी हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली. हंगामी अध्यक्ष खासदारांना शपथ देण्याचं काम करतात आणि सभागृहाचं कामकाज पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत चालवतात. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची निवड हंगामी अध्यक्ष म्हणून केली जाते. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि केरळमधल्या मावेलिक्करा मतदारसंघाचे खासदार कोडीकुनिल सुरेश यंदाचे हंगामी अध्यक्ष असण्याची शक्यता होती. आठव्यांदा खासदार झालेले कोडीकुनिल सुरेश चौथ्यांदा मावेलिक्करामधून निवडून आलेत आणि खासदारकीच्या वर्षांनुसार सदनात सर्वात ज्येष्ठ आहेत. मात्र, राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तुहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भर्तुहरी महताब ओडिशाच्या कटक मतदारसंघातून सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या निवडीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं..घटनेच्या कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्षांची निवड होते. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीच्या आदल्या दिवशी उमेदवारांच्या पाठिंब्यासाठीच्या नोटीस सदस्यांना सादर कराव्या लागतात. निवडणुकीच्या दिवशी साध्या बहुमताने लोकसभा अध्यक्षांची निवड होते. म्हणजेच त्यादिवशी लोकसभेत हजर असलेल्या खासदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जणांनी मत दिलेला उमेदवार हा लोकसभेचा अध्यक्ष होतो. याशिवाय लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी इतर कोणतीही अट वा पात्रता पूर्ण करावी लागत नाही. पण अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीला सभागृहाचं कामकाज, त्याविषयीचे नियम, देशाची घटना, कायदे याविषयीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं.