विधान परिषदेसाठी येत्या १२ जुलैला ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीमधील तीनही पक्षांनी आपापल्या संख्याबळानुसार उमेदवार जाहीर केले असून आत्तापर्यंत महाविकास आघाडी कडून दोन उमेदवारांची नाव समोर आली आहेत. परंतु महाविकास आघाडी आपला तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. जर का महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार दिला तर निवडणूक होऊ शकते त्यामुळे माविआला मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. यामुळे महायुतीमधील आमदार क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता जास्त असल्याने याचा फटका महायुतीला बसणार आहे.
कोणत्या आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होणार?
महायुती आणि महाविकासआघाडी मधील ११ आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. या ११ आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपच्या चार आमदारांचा समावेश आहे तर काँग्रेसच्या दोन आमदारांचा यामध्ये समावेश आहे. तसेच यामध्ये शिवसेना,रासप,राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी एक आमदार आहे. तसेच शेकापचे जयंत पाटील यांचा देखील कार्यकाळ पूर्ण होत आहे.
आमदारांना निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक?
महाराष्टामधील विधानसभेची सदस्यसंख्या २८८ असून काही आमदारांचे निधन झाले आहे तर त्यामधील काही खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत २७४ आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांचा कोटा कमी झाल्याने प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी २३ मते मिळणे आवश्यक आहेत. ज्या उमेदवाराला २३ पेक्षा कमी मते मिळतील तो उमेदवार पराभूत होईल.
सद्यस्तिथीत विधानसभेत कोणत्या पक्षाचे किती आमदार?
विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या २८८ असली तरी सध्या विधानसभेत २७४ सदस्य आहेत. यात महायुतीमधील भाजपचे एकूण १०३ आमदार आहेत तर शिवसेनेचे ३८ आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३९ आमदार आहेत. तर महाविकास आघाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे १५ आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १४ आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाचे एकूण ३६ आमदार आहेत.
मागच्या वेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने महाविकास आघाडीची मते फुटली होती त्यामुळे काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. राज्यसभा निवडणुकीतही क्रॉस वोटिंग झाल्याने त्यावेळी शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले होते.लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महायुतीसाठी धक्का देणारे होते. त्यातच आता आमदारांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले काही आमदार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असल्याने यावेळी महायुतीच्या आमदारांकडून क्रॉस वोटिंग होण्याची जास्त शक्यता दर्शवली जात आहे. महाविकास आघाडीकडे तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील महाविकासआघाडीचे तीन उमेदवार कसे निवडून येतील याबद्दल बोलताना म्हणाले की जी काही ताकद विधान परिषदेसाठी लागणार आहे त्या आमदारांची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. मला शरद पवारांनी शब्द दिला होता तसेच मला इंडिया आघाडीची उर्वरित मतेही मिळतील. असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.जे आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे त्यांची भूमिका विधान परिषद निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांशी चांगला सुसंवाद असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला फायदा होणार तर कुणाला झटका बसणार हे ह्या निकालातून समोर येईल.