लोकसभा निवडणुकीत भाजपाला फार मोठा फटका बसला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आत्तापासूनच तयारीला सुरवात केली आहे. भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. आणि याची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. रविवारी ११ ऑगस्टला भाजपा प्रदेश कार्यालयात भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली यामध्ये निवडणुकीची तयारी, आढावा आणि निवडणुकीचे नियोजन कशाप्रकारे असेल हे ठरण्यात आले.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र पक्षाच्या कोअर कमिटीच्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या पार पडलेल्या या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत असा निर्णय घेण्यात आला आहे.