राज्यात सध्या सगळीकडे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा देखील झाले आहेत. तर अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा या योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा शुभारंभ पार पडला.या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबत मोठं विधान केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना म्हटलं की, आम्ही तुम्हाला १५०० रुपये महिन्याला देत आहोत, म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये. ही लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. उद्या आपल्या सरकारची ताकद आणखी वाढली आणि तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तर या दीड हजारांचे पावणे दोन हजार होतील, पावणे दोन हजारांचे दोन हजार होतील, तुम्ही बळ दिलं तर दोन हजारांचे अडीच हजार होतील आणि अडीच हजारांचे तीन हजार होतील”, असं मोठं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. ज्यांनी-ज्यांनी कोरोनाच्या काळातही सोडलं नाही. पुण्यात देखील काही कोरोना सेंटर्स उभे केले आणि खोटे रुग्ण दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले. एवढंच नाही तर रुग्णांच्या तोंडची खिचडीही पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास पळवायचा होता. आताही तुमच्या तोंडचा घास हिरवण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. पण मी तुम्हाला सांगतो की, आनंदाचा शिधा आपण दिवाळी दसरा आणि गणपतीमध्ये देतो. त्यामध्ये रवा, मैदा, साखर, तेल, डाळ असं सर्व असतं. त्याही विरोधात ते न्यायालयात गेले होते. विरोधक हे पाप कुठे फेडणार आहेत? मात्र, आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजेनबाबत जे विधान केलं आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण अगदी काही महिन्यानावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. या अनुषंगाने महायुतीकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत बंड केल्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रतिमा राज्यात मालिन झाली. त्यामुळे दोघांकडूनही डॅमेज कंट्रोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. आता हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.