मुंबई | राज्यात आज 1444 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2006 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,39, 594 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.03 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 10902 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4412 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2478 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2,152 रुग्णांची घट झालीय. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. ही जून महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत झालेली सर्वाधिक घट आहे. याआधी 07 जून रोजी देशात 7,233 रुग्णांची नोंद झाली होती आणि त्यानंतर कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळाला. देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. देशात गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.