लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळं त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. आता विधानसभा निवडणूक अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील यश प्राप्त करायचं लक्ष त्यांनी ठेवलं आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले असून जागावाटपासंदर्भात सातत्यानं चर्चा सुरु आहे. या प्राथमिक चर्चेमध्ये महाविकास आघाडीचे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं आहे. आता महाविकास आघाडीचा मुंबईतला जागावाटपाचा फॉर्मुला काय ठरला आहे.. हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
लोकसभेला महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २१ जागा लढवल्या व ९ जिंकल्या तर काँग्रेसने १७ जागा लढवून १३ जागांवर विजय मिळवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वात कमी १० जागा लढवून ८ जागांवर विजय मिळवला. ४८ जागांपैकी ३० जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्मुला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मुंबईमध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप कसे असेल ते पाहूया. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालावर मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचे जागावाटप करणार आहे. मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी चार मतदारसंघावर महाविकास आघाडीने विजय मिळवला. विजय मिळवलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले तर मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पाटील विजयी झाले आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले. तर मुंबईमध्ये लोकसभेला ज्या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे त्या मतदारसंघात महाविकास आघाडी समान सूत्र वापरणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीने यासाठी ३, २, १ असा फॉर्मुला तयार केला असल्याचं बोललं जात आहे. आता महाविकास आघाडीचा हा ३, २, १ फॉर्मुला काय आहे ते जाणून घेऊयात.. लोकसभेला विजय मिळालेल्या या चार लोकसभा मतदारसंघाच्या जागांशी संबंधित असलेल्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत लोकसभेला जास्त जागा जिंकलेला पक्ष तीन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल तर लोकसभेला दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष २ विधानसभा मतदारसंघात जागा लढवेल तर महाविकास आघाडीत लोकसभेला सर्वात कमी जागा जिंकणाऱ्या पक्षाला एकच विधानसभा मतदारसंघ वाट्याला येणार आहे.