विधानसभा निवडणूक ही दिवाळी नंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं यामुळे विधानसभेला देखील विजय कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेला मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रयत्न करत आहेत. जागावाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीत बैठका सुरु आहेत. मात्र काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांवर दावा केल्याने महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.
जागावाटप पूर्ण होण्याआधीच नाना पटोले यांनी सात विधानसभा मतदारसंघांवर दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमधल्या इतर घटक पक्षांची कोंडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने भंडारा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चार विधानसभेवर दावा केला आहे. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. ते दोन्ही जिल्ह्यातील एकही जागा सोडण्यास तयार नसल्याचं समजत आहे यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. परंतु जागावाटपावेळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतल्या कोणत्या घटक पक्षाकडे किती मतदारसंघ जाणार हे जागावाटपावेळी स्पष्ट होईल.