पुण्याची ओळख… विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत, पुरोगामी शहर… जगभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येत असतात. विशेषतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी झाल्यास काही टोकाचं पाऊल उचलतात तर काही नैराश्यात जातात. मात्र नैराश्यात जाऊन एका युवकाने केलेला अजब प्रकार पुण्यातल्या पाषाणमधून समोर आला आहे. नेमका काय प्रकार घडला आहे जाणून घेऊ.
स्पर्धा परीक्षांत अपयश आलं म्हणून युवक नैराश्यात गेला. आपल्याला परीक्षेत यश मिळावं या आशेने युवकाने सोशल मीडियावर एका समुपदेशक महिलेची जाहिरात पाहिली. जाहिरात पाहून युवक महिलेकडे उपचारासाठी गेला.पुण्यातील पाषाणमध्ये या महिलेची कन्सल्टन्सी होती. पण या कन्सल्टन्सीच्या नावाखाली महिलेचा सुरु होता तो जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार.वृषाली ढोले शिरसाठ असं नाव असणाऱ्या या महिलेकडे युवक सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला कोणतीही समस्या न विचारता वृषाली ढोले हिने अतेंद्रीय शक्तीने त्याची समस्या ओळखल्याचं सांगितलं.युवकाचं आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असं सांगून ते वाढवण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख खाण्यास दिली. आणि पाय धुतलेलं पाणी देखील पिण्यास दिलं.त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणि पोटाचा विकार झाला. वृषालीने आपल्यात अतेंद्रिय शक्ती असल्याचं सांगून गंडा न बांधल्यास युवकाला मृत्युची भीती घातली. नैराश्य, आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषधोपचार घेण्याची गरज नाही असं भाकीत करुन युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची अर्थिक फसवणूक देखील केली.अखेर युवकाने वृषाली ढोले विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि युवकाने स्टिंग ऑपरेशन करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला.वृषालीसह तिघांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली ढोले-शिरसाठ लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणूक करत होती. अखेर तिचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मात्र सुशिक्षित तरुण अशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर अशा तरुणांनी वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्ही देखील आर्थिक फसवणुकीच्या व अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकण्यास वेळ लागणार नाही.