नवी दिल्ली | भारतीय लष्कर (Indian Army) आणि नौदलानंतर (Indian Navy) आता अग्निवीर म्हणून महिलांना लवकरच भारतीय वायुसेनेत (Air Force) संधी दिली जाणार आहे. पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती करण्यात येणार असल्याचे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी (Air Marshal V. R. Chaudhari) यांनी सांगितले.
भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला आहेत. परंतु एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा अद्याप समावेश झाला नाही. प्रथमच वायुसेनेत महिला सैनिक म्हणून रुजू होणार आहेत. पुढील वर्षी एकूण ३५०० अग्निवीरांची भरती होईल. त्यामध्ये ३% महिलांसाठी राखीव जागा असतील. यानंतर, दरवर्षी त्यात हळूहळू वाढ केली जाईल आणि चार वर्षांत ती १०% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्याचा आढावा घेऊन त्यानुसार किती टक्के महिलांची भरती करायची याचा निर्णय घेतला जाईल.
वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आम्हाला कुणालाही एका ट्रेडपुरते मर्यादित ठेवायचे नाही, त्यामुळे चार वर्षे अग्निवीर असताना त्यांना सर्व प्रकारची कामे शिकवली जातील त्या आधारे त्यांची चाचणी घेतली जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, कायमस्वरूपी असणार्यांपैकी जास्तीत जास्त २५% एअरमन बनतील आणि त्यांना पुन्हा ट्रेड दिला जाईल. या २५% महिलांची संख्या पूर्णपणे गुणवत्तेवर अवलंबून असेल.
दरम्यान, महिला अग्निवीर कायमस्वरूपी होतील तेव्हा, त्यांना एअरमन देखील म्हटले जाईल. महिलांची भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील, असे वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.