गुजरात | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आठवडाभरापूर्वीच उद्घाटन केलेली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चांगलीच चर्चेत आली आहे. कारण ट्रेन सुरु झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच दोनदा अपघात झाला आहे. यामध्ये आत्तापर्यंत एक गाय आणि चार म्हशी दगावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी ‘वंदे भारत’ रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एक ऑक्टोबरपासून या रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली. ‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबाद ते मुंबई मार्गावर धावते व केवळ सूरत आणि बडोदा स्टेशन या दोन स्थानकांवर थांबते. मात्र, नावाजलेल्या वंदे भारत या बुलेट ट्रेनचा अवघ्या एका आठवड्यात दोनवेळा अपघात झाला. या अपघातात एक गाय आणि चार म्हशी दगावल्या आहेत.
असे झाले अपघात…
पहिला अपघात – गुजरातमधील वटवा ते मनीनगर दरम्यान ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास झाला. रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत असताना काही म्हशींचा कळप लोहमार्गात अचानक आडवा आल्याने हा अपघात झाला. पण यात एक्सप्रेसचाच पुढचा भाग अक्षरश: तुटून पडला. तसेच ४ म्हशींचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रेल्वे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाकडून म्हशींच्या अज्ञात मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या पहिल्या अपघातात वंदे भारतचे मोठे नुकसान झाले. पुढचा भाग पूर्णपणे तुटला गेला मात्र अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी वंदे भारत एक्सप्रेस दुरुस्त होऊन रेल्वे रुळांवर सेवेसाठी सज्ज झाली.
दुसरा अपघात – दुसऱ्यांदाही अपघात झाला आहे. गुजरातमध्येच शुक्रवारी पुन्हा दुसऱ्या दिवशी या ट्रेनला जनावराने धडक दिली. या दुसऱ्या अपघातामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. गांधीनगरहून मुंबईकडे जाताना कंजारी आणि आणंद स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. एक गाय ट्रेनला धडकल्यामुळे पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वाजून ४८ वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रेनच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र सर्व प्रवाशी सुखरुप आहेत,अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.