नवी दिल्ली | अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक (Andheri East By Election) येत्या 3 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट फोन केला. सोनिया गांधी यांनी फोन करून ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली.
एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव कोणत्याच गटाला दिले नाही. तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या मैदानात असताना सोनिया गांधी यांनी त्यांना फोन करून आगामी पोटनिवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतची माहिती थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंना पाठिंबा द्यायचा आहे’, असा निर्णय सोनिया गांधींनी घेतला असून, त्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत, असे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या फोननंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले.