नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीबाबत काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Election Commission Gujarat HP Election 2022 press conference )
सध्या महाराष्ट्रातील महापालिकांचा कारभार प्रशासकंच्या हाती आहे. तर दुसरीकडे पोटनिवडणूक देखील जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक या महिन्यात म्हणजेच दिवाळीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही राज्यांचा दौरा केला आहे. निवडणूक आयोग आता निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी आयोगाच्या टीमने दोन्ही राज्यातील अनुकूल हवामान, शालेय परीक्षा, स्थानिक सण-उत्सव, शेती आणि इतर काही कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात येते पण यावेळी जम्मू – काश्मीरचा बदललेला नकाशा आणि वाढलेल्या जागांमुळे या राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रकही बदलेल, अशी अपेक्षा होती. आता अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी संकेत दिले होते की नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या उंच पर्वतीय भागात कडाक्याच्या थंडीमुळे, येथील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात.