नवी दिल्ली | भारतीय महिला संघाने नुकतेच आशिया कप २०२२ वर आपले नाव कोरलं आहे. मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल कामगिरीनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबाही दिसून येत आहे. ज्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठं पाऊल उचलत पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे.
जय शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. स्त्री-पुरुष भेदभाव दूर करण्यासाठी बीसीसीआयने हे प्रथमच पाऊल उचललं आहे, हे सांगताना आनंद होत असल्याचेही जय शाह यांनी म्हटलं आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत, असंही ते म्हणाले.
“आपण आता लैंगिक समानतेच्या एका नव्या युगात प्रवेश करतोय. अशा परिस्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिला खेळाडूंनाही पुरुषांइतकीच मॅच फी दिली जाईल. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुषांना 15 लाख रुपये मॅच फी दिली जाते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी पुरुषांना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. तर, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना 3 लाख रुपये मिळतात. आता, पुरुष खेळाडूंप्रमाणेच ही रक्कम महिला क्रिकेटर्सनाही दिली जाईल.
भारतीय महिला क्रिकेटर्सनी मागील काही वर्षात कमाल खेळी करत अनेक स्पर्धांमध्ये तसंच दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये आयसीसी महिला विश्वचषकच्या फायनलमध्ये भारतीय महिला पोहोचल्यानंतर क्रिकेटरसिक अधिक आवडीनं महिला सामने पाहू लागले. त्यात स्मृती मंधाना, हरमनप्रीत अशा दमदार बॅटर्समुळे सामने रंगतदार होत आहेत. २०२० मध्येही टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचली होती. तसंच कॉमनवेल्थमध्येही महिलांनी रौप्यपदक मिळवलं होते.