गुजरात | लवकरच गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुशंगाने आज दुपारी १२ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्ष १८ फेब्रुवारी रोजी संपणार असला तरी त्यापूर्वी निवडणुक घेऊन निकाल घोषित करण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातात. १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ ला पूर्ण होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा डिसेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती.
हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी केली जाईल. यापूर्वी २०१७ मध्ये राज्यांमध्ये निरनिराळ्या तारखांना मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. परंतु मतमोजणी १८ डिसेंबरला एकत्रच करण्यात आली होती.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाने (आप) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने आतापर्यंत १०८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० हून अधिक उमेदवारांची घोषणा करणारा आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ४ नोव्हेंबरला दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी २९ ऑक्टोबर रोजी दिली होती. चेन्निथला या तीन सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.