नवी दिल्ली | श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळत आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोठं विधान केले आहे. ”श्रद्धा वालकर या तरूणीने पोलिसांत पत्र पाठवून तक्रार केली होती. मात्र, कारवाई झाली नाही. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. पण यामध्ये जे कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”.
अमित शहा यांनी श्रद्धा वालकर प्रकरणावर आरोपीला कठोर शिक्षा करण्याबाबतचे विधानही केले. ते म्हणाले, ”जे पत्र समोर आलं. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धानं महाराष्ट्रातील एका पोलिस ठाण्यात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिला जीवे मारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाणार आहे. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे जे कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”
आरोपींला कठोर शिक्षा होणार
श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल. संपूर्ण प्रकरणावर माझं लक्ष आहे, असेही गृहमंत्री शहा यांनी सांगितले.