गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेस, आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता भाजपला निवडणुकीपूर्वी जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते जय नारायण व्यास यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जय नारायण व्यास हे गुजरात भाजपमधील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. ते चारवेळा आमदार आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र समीर व्यास यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. व्यास पिता-पुत्रांना खर्गे यांनी काँग्रेसचे सदस्यत्वही दिले आहे. व्यास यांच्या काँग्रेस प्रवेशाने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत आव्हान
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. प्रचारसभा घेत विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. भाजपला काँग्रेस, आपचे या निवडणुकीत आव्हान असणार आहे.