एखाद्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातच सीबीआयचा वापर होऊ नये अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे कन्हैया कुमार यांनी बोट दाखविले आहे.
केंद्रीय एजन्सींचा वापर देशाच्या सुरक्षेसाठी करण्याऐवजी केंद्र सरकार स्वतःची खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर करत आहे, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे, आम्हाला तर शंका आहे की एखाद्या दिवशी गडकरींच्या विरोधात ही सीबीआयचा वापर होऊ शकते असे सूचक वक्तव्य ही कन्हैय्या कुमार यांनी केले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज नागपुरात काँग्रेस नेत्यांकडून टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.
“युवा है जोश में लायेंगे इन्हे होश में” या घोषवाक्यासह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई हे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत, हे सर्व थांबवायचं असेल, तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.