मुंबई | कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सीमाप्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाहनावर बेळगावात दगडफेक करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटकला चांगलेच सुनावले. ‘हे प्रकरण येत्या 48 तासांत संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल’, असा इशाराच पवारांनी दिला.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले, येत्या 48 तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथील स्थानिकांना धीर द्यावा लागेल. तसेच वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्र्यांची नाराजी
महाराष्ट्राच्या वाहनावर बेळगावात झालेल्या दगडफेकीनंतर महाराष्ट्र सरकारकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.