शिमला | हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपचा पराभव झाला आहे. त्यात काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी भाजपमधील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात आता सुखविंदर सुक्खू यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ”हिमचालमध्ये काँग्रेसकडे 43 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये 3 अपक्षांचा समावेश आहे. तसेच भाजपचे काही आमदार काँग्रेससोबत येऊ शकतात”.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या दलाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. आता सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.