डेहराडून | भारतीय संघाचा फलंदाज रिषभ पंत याचा नुकताच भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, त्याची चारचाकी गाडी जळून खाक झाली. सध्या रिषभ पंतवर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याला भेटण्यासाठी मंत्री, अधिकारी, चाहत्यांची रांग लागल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता त्याचे कुटुंबीय “रिषभला आधी बरे होऊ द्या” असे म्हटले आहे.
मंत्री, चाहते हे मॅक्स रुग्णालयामध्ये जाऊन रिषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. पाहुण्यांच्या या गर्दीमुळे जखमी रिषभला विश्रांती मिळत नाही. रुग्णालयाच्या निर्धारित वेळेनंतरही रिषभला भेटणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे आता रिषभला विश्रांतीची संधी द्यावी, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
रिषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रिषभ पंतची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. तसेच अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, पंत सध्या बरा आहे. संसर्गाचा धोका पाहून त्याला खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल. बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. पूर्ण बरी होईपर्यंत तो डेहराडून येथील रुग्णालयातच राहील, असेही शर्मा यांनी सांगितले.