पटणा | केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री अश्विनी चौबे (Ashwini Kumar Choubey) पटणा येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी भाजप नेते परशुराम चतुर्वेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते ढसाढसा रडू लागले. त्यांच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
परशुराम चतुर्वेदी हे जमिनीची योग्य किंमत आणि मोबदला या मागणीसाठी बक्सरमध्ये 86 दिवसांपेक्षा जास्त दिवस आंदोलनाला बसले होते. यादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मंत्री चौबे यांना अश्रू अनावर झाले. त्याबाबत चौबे म्हणाले, ”चतुर्वेदी यांनी शेतकऱ्यांसाठी त्याग केला आहे. चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. मी आधीच दु:खी होतो. या घटनेने मला इतके दुःख झाले की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही”.
ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
परशुराम चतुर्वेदी यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते केंद्रीयमंत्र्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत, निदर्शनात ते सोबत होते. परंतु जेव्हा परशुराम चतुर्वैदींचे निधन झाले तेव्हा अश्विनी चौबे यांनाही धक्का बसला.