६ एप्रिलला मोहिमेस प्रारंभ; आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे | जगातील सर्वांत उंच शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते. गिर्यारोहक असलेल्या व पुण्यातील बाणेर येथे राहणाऱ्या सुविधा कडलग या महिलेने हे उंच शिखर सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि त्या मोहिमेस येत्या ६ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणे ही शारिरीक, मानसिक कसोटी पाहणारी गोष्ट आहेच. परंतु, त्यासोबतच आर्थिकदृष्ट्याही ती खर्चीक आहे. यामुळंच गृहिणी असलेल्या गिर्यारोहक सुविधा कडलग यांनी या मोहिमेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन आज पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
गिर्यारोहक सुविधा कडलग या पती व दोन मुलांसह राहतात. त्या गृहिणी आहेत. आणि मुलांचा सांभाळ करीत असतानाच त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला सिंहगड किल्ला चढून हा छंद जोपासला गेला. त्यानंतर मात्र, सुविधा यांना त्याहून उंच असलेल्या डोंगर व शिखरांनी आकर्षित केले. त्यांनी हिमालयातील गोरीचेन ग्लेशर, माउंट नून, कांग्यात्से २ इत्यादी शिखरे सर केली आहेत. घर संसार सांभाळून सुविधा कडलग यांचा हा गिर्यारोहकाचा प्रवास यशस्वीपणे सुरु आहे. लहानपणापासूनच त्यांना साहसी खेळांचे आकर्षण आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये त्यांनी १०० हून अधिक ट्रेक केले आहेत.
आर्थिक मदतीचे आवाहन
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुविधा कडलग यांनी माउंटन कांग्यत्से (६२५० मीटर) आणि माउंटन नुन (७१३५ मीटर) शिखर सर करण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. गिर्यारोहन करणे शारिरीक व मानसिक कसोटी पाहते. त्यासोबत आर्थिकदृष्ट्याही ते खर्चिक आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर सर करण्यासाठी खर्चही तितकाच जास्त आहे. त्यामुळे कंपन्या, उद्योजक व संस्थांनी त्यांच्या सीएसआर फंडातून आर्थिक मदत करावी, असे आवाहनही सुविधा कडलग यांनी पत्रकार परिषदेत केले.