पटणा | येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आज पटण्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. तसेच या बैठकीत दिल्लीतील अध्यादेशावर काँग्रेसने राज्यसभेत आपच्या बाजूने समर्थन द्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पटण्यामधून बोलताना, मोदी हुकूमशाहप्रमाणे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी प्रयत्नशील आहे असं वक्तव्य केलं आहे. तसेच भारताच्या मूलभूत विचारांवर आक्रमण केलं जात आहे, भारताच्या मूलभूत संस्थांवर हल्ले केले जात आहेत. ही विचारांची लढाई आहे. आमच्यातही काही मतभेद असतील पण सर्वांना एकत्रित करुन, सर्वांचे विचार घेऊन आम्ही एकत्रित जाणार आहोत असेदेखील ते म्हटले आहेत.
पटण्यातून जी आंदोलनं सुरू झाली ती नंतर मोठी झाली हा इतिहास आहे. त्यामुळे ही बैठक दिल्लीत नाही तर पाटण्यात घेण्याचा विचार मी मांडला. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही एकत्रित लढणार आहोत, आम्हीही देशभक्त आहोत, पण भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. कुणी सरकारच्या विरोधात बोललं तर त्याच्याविरोधात ईडी, सीबीआय लावली जाते. पण देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांवर काहीही बोललं जात नाही. जर 2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आलं तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत हे नक्की त्याचबरोबर भाजपला इतिहास संपवायचा आहे, पण आम्हाला इतिहास सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आम्ही लढत राहू असं विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीमध्ये केलं आहे.
देशात सांप्रदायिक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. आता आपल्याला एकत्र येऊन भाजपचा सामना करावा लागेल सर्व वाद बाजूला ठेवणे आवश्यक आहे. जयप्रकाश यांच्या नेतृत्वात पाटण्यातून सूरू झालेलं आंदोलन देशात पोहचलं होतं. आता देखील हेच होताना पाहायला मिळेल असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आता देशभरात आहे. गांधी-नेहरूंच्या विचाराच्या या देशाला वाचवण्याची गरज असल्याचं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची मत मतांतरे असतील, परंतु देश एक आहे. स्वातंत्र्यावर जो आघात करेल त्याला आम्ही मिळून विरोध करू. जे देशात तानाशाही आणायचं प्रयत्न करतील त्यांना आम्ही विरोध करत राहू. आता सातत्यानं बैठका होताना पाहायला मिळतील.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांची पुढची बैठक ही शिमल्यात होणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी ती 12 किंवा 13 जुलै असल्याचं सांगितलं जातंय. निवडणूक लढवण्यासाठी किमान समान कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.