नवी दिल्ली | कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका होऊन ते अधिकारी अखेर मायदेशी परतलेत त्यामुळे भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे. या अधिकाऱ्यांना अटक करण्यामागं नेमकं काय कारण असावं? या प्रकरणातील पडद्यामागचा हिरो कोण? याविषयीची अधिक माहिती सदर व्हिडीओतून पाहायला मिळेल…
अटक करण्यात आलेल्या या माजी नौदल अधिकाऱ्यांवर दोहामधील एका पाणबुडी प्रकल्पाबद्दलची संवेदनशील माहिती इस्रायलला पुरवल्याचा आरोप होता. कतार कोर्टानं २६ ऑक्टोबर २०२३ रोजी या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी भारताने हा धक्कादायक आणि एकतर्फी निर्णय असल्याचे म्हटलं होते. या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबींचा शोध घेऊन न्यायालयीन लढा देण्यात आला होता…
कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेचं भारत सरकारने स्वागत केलं आहे. या आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. आम्ही या अधिकाऱ्यांच्या सुटकेचं आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या कतार राज्याच्या अमीरच्या निर्णयाचं कौतुक करत आहोत असं परराष्ट्र मंत्रालयानं माहिती देताना म्हटलं…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारचे राजे यांच्यासोबत असलेले चांगले संबंध आणि पडद्यामागून काम करत असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कुटनीती या प्रकरणात कामाला आली आहे. त्यामुळे गेल्या १८ महिन्यांपासूनची लढाई या अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर भारताने जिंकली आहे.
कतार सरकारसोबत मुत्सद्दी चर्चा करण्याचे काम परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यशस्वीपणे करत होते. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार अजित डोवाल पडद्यामागे राहून कुशल चर्चा करत होते. हिंदूस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, अजित डोवाल यांनी गेल्या काही महिन्यात अनेक दोहा दौरे केले आहेत. या दौऱ्यावेळी कतार नेतृत्वाला भारताची बाजू सक्षमपणे मांडण्याचे काम डोवाल यांनी केल्याचं कळतंय…भारत सरकारसाठी हा मोठा राजनैतिक विजय असल्याचं बोललं जातंय…एकंदरीत भारत सरकारच्या सर्व बाजूंनी केलेल्या प्रयत्नांमुळे माजी नौदल अधिकारी आज भारतात आपल्या मायदेशी परतलेत…त्यामुळे नक्कीच ही भारतासाठी अभिमानाची गोष्टच म्हणावी लागेल…