निवडणुकांचं वारं वाहू लागलं की कार्यकर्त्यांना, पक्ष निष्ठावंतांना उमेदवारीचे वेध लागतात. पण मोठ्या पक्षांकडून प्रत्येकाला संधी मिळतेच असं नाही..अशावेळी नाराज झालेले काही जण स्वतःचा पक्ष काढून राजकीय नशीब अजमावतात.. सध्या देशातल्या राजकीय पक्षांची संख्या बघाल तर, चक्रावून जाल. सध्याच्या घडीला नोंदणीकृत असलेल्या राजकीय पक्षांची संख्या २५०० हून अधिक आहे.. आकडा मोठा आहे आणि त्यात वाढच होताना दिसत आहे. आता यामध्ये राष्ट्रीय पक्ष नेमके किती? वर्षागणिक ही आकडेवारी कशी वाढत गेली. कोणत्या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा गेला? कुणाला तो मिळाला… हे जाणून घेऊयात…
मे २०२३ मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात ६ राष्ट्रीय पक्ष असून राज्य पक्षांची संख्या ५४ आहे. याशिवाय २,५६७ अपरिचित राजकीय पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी हे निवडणूक आयोग मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत. जे अडीच हजार हून अधिक राजकीय पक्ष आहेत… त्यातील बरीच नावं क्वचितच तुम्ही कधी ऐकली असतील…अपनी जिंदगी अपना दल, गरीब आदमी पार्टी, तुम्हारी-मेरी पार्टी, रायता भारत पार्टी, पिरॅमिड पार्टी ऑफ इंडिया, ऑल पेन्शनर्स पार्टी, लेमन पार्टी, व्होटर्स इंडिपेंडंट पार्टी यासारखे पक्षही नोंदणीकृत आहेत.
याशिवाय गरीब बेरोजगार विकास पार्टी, सबसे पार्टी, देवता दल, अंजान आदमी पार्टी, अपना किसान पार्टी, भारतीय महापरिवार पार्टी, बहुजन हसरत पार्टी, आपकी अपनी पार्टी, स्वच्छ स्वास्थ्य स्वावलंबिजन पार्टी, मजदूर पार्टी, लव्हर्स पार्टी, रिलिजन ऑफ मॅन अशा नावांनी पक्ष अस्तित्वात आहेत. हे सर्व नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष आहेत ही वेगळी बाब आहे. त्यांच्याकडे स्वतःचं कोणतंही निश्चित निवडणूक चिन्ह नाही. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त निवडणूक चिन्हांमधून त्यांना त्यांचं चिन्ह निवडावं लागतं. त्यांच्या उमेदवारांना प्रत्येक क्षेत्रात एकच निवडणूक चिन्ह मिळावं असंही नाही. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या चिन्हांवर लढावं लागेल. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार सध्या भारतीय गण वार्ता पक्ष, संयोगवादी पक्ष आणि कल्याण राज्य प्रगती पक्ष या राजकीय पक्षांच्या नावाने नोंदणीसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत…
आपल्या राज्यात महाराष्ट्रात सामान्य जनतेला परिचित असणारे मोजकेच २० ते २५ पक्ष असतील.भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार असे काही मोजके आणि महत्वाचे पक्ष आहेत… पण या खेरीजही महाराष्ट्रात असे शेकडो छोटे मोठे पक्ष आहेत. या छोट्या मोठ्या पक्षांनी त्यांची रीतसर नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोठया पक्षांसोबतच काही वेळा हे छोटे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली चमक दाखवून देतात.