मुंबई | राज्यातील अनेक जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेलं आहे. लम्पी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेदेखील खबरदारी घेतली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील तबेले व गोशाळा येथे कीटक नियंत्रण उपाययोजनांसह सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.
प्रामुख्याने गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरिय उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. या उपाययोजना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहेत.
सन २०१९ च्या पशुगणनेनुसार मुंबई क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या जनावरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून, महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.