- दैनिक प्रभातचे बातमीदार हर्षद कटारिया यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर
पुणे | दि पूना मर्चंटस् चैबरतर्फे व्यापार महर्षी उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित दरवर्षी ‘आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार’ प्रदान केले जातात. यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून राज्यस्तरीय पुरस्कार मे. समर्थ भंडारचे रत्नागिरीचे सुहास पटवर्धन, पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार मे सतीश ट्रेडिंग कंपनी आळंदीचे सतीश चोरडिया यांना तर, पुणे शहर स्तरीय पुरस्कार मे. जयश्री ग्रोसरी अॅन्ड ड्रायफ्रुटस प्रा. लि. कोथरूड चे श्याम अगरवाल यांना देण्यात येणार आहेत. दि पूना मर्चंट्स चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार मे जवाहरलाल बोथरा अॅन्ड कंपनी या फर्मचे संचालक जवाहरलाल बोथरा यांना जाहीर झाला आहे. कै वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ दैनिक प्रभातचे बातमीदार हर्षद कटारिया यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण समारंभ येत्या रविवार (२५ सप्टेंबर) सायंकाळी ५.०० वाजता ‘महात्मा फुले सांस्कृतिक भवन, फातिमानगर, वानवडी, पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार माधुरी मिसाळ व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी व प्रसिद्ध उदयोजक प्रकाश धारिवाल उपस्थित राहणार आहेत.
व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फ देण्यात येतो. यंदाचे या पुरस्काराचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे. मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, वालचंद संचेती, राजेंद्र गुगळे आदी मान्यवर उपस्थित होते.