पुणे | पुण्यातील धनकवडी मध्ये भारती विद्यापीठाच्या मागे महाकालीचे रूप असलेल्या श्री सच्चियाय माताजी नवदुर्गा मंदिर आहे. रवींद्रकुमार सांकला यांना २७ वर्षांपूर्वी सच्चियाय माताजीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी वडील नौपतलाल सांकला व बंधु राजेशकुमार सांकला यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चियाय माताजीचं नवदुर्गा मंदिर उभारले.
सच्चियाय माता ही मूळ राजस्थानमधील ओशियाड याठिकाणची आहे. ओसवाल व माहेश्वरी समाजाची सच्चियाय माता कुलदैवत आहे. पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या या समाजाला कौटुबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी प्रत्येकवेळी राजस्थानमध्ये जावं लागत असे. परंतु, हे मंदिर झाल्यामुळे याठिकाणीच दर्शनाची व्यवस्था झाली.
परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या हस्ते धनकवडी येथील सच्चियाय माता नवदुर्गा मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. सौ प्रमिला नौपतलाल सांकला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सांकला परिवाराकडून वर्षभर सच्चियाय माताजी नवदुर्गा मंदिराची सेवा केली जाते.
श्री सच्चियाय माताजी नवदुर्गा मंदिरात पद्मावती माता, तुळजाभवानी, महालक्ष्मी आदी नऊ देवींच्या मुर्त्या व त्यांची मंदिरं आहेत. त्यामुळे हे मंदिर श्री सच्चियाय माताजी नवदुर्गा मंदिर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच श्री गणेश, कालभैरव, रामभक्त हनुमान यांचीही मंदिरं याठिकाणी आहेत. भारती विद्यापीठाजवळ हे मंदिर असल्याने गेल्या २७ वर्षांत देशभरातील याठिकाणी शिकायला आलेली मुलं मंदिरात दर्शनासाठी येतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुण्यात आल्यानंतर आठवणीने देवीच्या दर्शनासाठी येतात.