पुणे | शहरात झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी शहरातील नेते मंडळी करत असलेल्या कुरघोड्या आपल्या भाषणात उघड केल्या. माधुरी मिसाळ म्हणाल्या, भाजपचे सरकार आले आहे. आता विविध महामंडळांवर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या. तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना शहरातील नेते मंडळी पोहोचूच देत नाहीत. मिसाळ यांनी हे सत्य मांडताच उपस्थित कार्यकर्त्यांनी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना समर्थन दिले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार सोहळा टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माधुरी मिसाळ बोलत होत्या. कार्यकर्त्यांच्या मनातील खंत मिसाळ यांनी मांडल्याने त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना अधिक भावले. मिसाळ यांनी नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली की, कार्यकर्ता मोठा झाला तर आपल्याला नुकसान होईल म्हणून नेते मंडळी, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता मागे राहत आहे, त्याला न्याय द्या.
छोटे मन से कोई बडा नही होता तुटे मन से कोई खडा नही होता…
हा शेर म्हणत आ. मिसाळ यांनी शहरातील पदाधिकार्यांना सुनावले.त्या म्हणाल्या, भाजप सरकार नसताना आपले सरकार येईल की नाही या भीतीने जे कुंपणावर होते, केवळ मलिदा पाहत होते, त्यांनाही यापुढे लक्षात ठेवा व आगामी निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या.
त्यांच्या या मागणीचे उपस्थितांनी घोषणा देत स्वागत केले.