पुणे | पुण्यामध्ये काल (१७) च्या मध्यरात्रीपासून परतीच्या वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. संपूर्ण पुणे शहर जलमय झालेलं पाहायला मिळाल. यामुळे नदी नाले त्याचबरोबर रस्तेदेखील पाण्याने ओसंडून वाहू लागले.
राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचं देखील मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. दगडूशेठ गणपती मंदिरात देखील पाणी शिरलं होत. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी शिरल्याने मोठ नुकसान झाले होते.
राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांचा चांगलीच धावपळ झाली. त्यामुळं याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड ,रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड, अग्निशमन केंद्र हडपसर, गाडीतळ या सर्व ठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ते ओसंडून वाहत होते.
रमणा गणपतीजवळ पर्वतीमध्ये एका ठिकाणी भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली आहे. तर हडपसरमध्ये आकाशवाणीजवळ झाड पडल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, शिवाजीनगर परिसरात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी पाण्यात ७ नागरिक अडकले होते. यामध्ये ५ मोठे नागरिक आणि २ लहान मुलांचा समावेश होता. त्यांना रश्शीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. मंगळवार पेठेतही पाणी शिरलं होतं. तर आनंदनगरमधून पाच जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. यामध्ये ३ लहान मुली १ महिला १ पुरुष होते.
पुण्यात आजही पावसाची शक्यता
दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार असल्याने सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, काही दिवसात पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारपर्यंत (१६ ऑक्टोबर) महाराष्ट्रात फारसं ढगांचं आवरण नव्हतं. मात्र १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नाही तर दक्षिण भागावर ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात आर्द्रतेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आणि १७ ऑक्टोबरपासून पश्चिम-वायव्य दिशेच्या हालचालींसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.