पुणे | एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी एमआयटी एडीटी) 3.5 रेटिंग देण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईच्या माध्यमातून 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी हे रेटिंग मिळाले आहे. तसेच देशातील खासगी विद्यापीठ वर्गवारीत 170 खासगी विद्यापीठात 13 वे मानांकन मिळाले आहे.
देशातील 1823 संस्थापैकी सर्वश्रेणीमध्ये 59 वे मानांकन जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता. याची घोषणा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय (एमओई) डॉ. सुभाष सरकार यांनी राष्ट्रीय इनोव्हेशन दिनानिमित्त नुकतीच केली.
एमएचआरडी इनोव्हेशन सेलने संस्था इनोव्हेशन कौन्सिलची वार्षिक कामगिरी रेटिंग जाहीर केली आहे. देशभरात एकूण सहा हजाराहून अधिक आयआयसी संस्था स्थापन करण्यात आल्या असून, त्यापैकी 1823 आयआयसी संस्थांचे रेटिंग करण्यात आले आहेत. एमएचआरडीने दिलेले कमाल स्टार रेटिंग 3.5 स्टार होते. आयआयसी एमआयटी एडीटी विद्यापीठाला 3.5 स्टार मिळाले आणि देशातील आयआयसीमध्ये शीर्ष 59 वे तर पश्चिम भारतातील शीर्ष 4 स्थान मिळाले आहे.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आयआयसीच्या यशाने विद्यापीठाची संशोधनातील कार्याची दखल घेण्यात आली. हे यश आमच्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक, सदस्यांसह सेलच्या वर्षभराच्या मेहनतीचे फलित आहे. इनोव्हेशन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक कठोर परिश्रम घेत आहेत, जेणेकरून आम्ही एमआयटी एडीटी विद्यापीठाला ग्लोबल इनोव्हेशन प्लॅटफॉर्मच्या सर्वाच्च स्थानावर घेऊन जाऊ.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ सुनीता मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, आयआयसीचे संयोजक प्रा. डॉ. विरेंद्र भोजवानी, प्रा. अशिष उंबरकर, प्रा. राजेश सिद्धेश्वर, प्रा. प्रतीक जोशी, प्रा. गणेश केकाण आणि त्यांच्या टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.