पुणे | नवीन शैक्षणिक धोरण मानवाला परिपूर्ण करणारे असून, जगातील सर्व विद्यापीठाशी करार करण्याचे कार्य सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. चार वर्षांची पदवी व अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. तसेच या बदलामुळे प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर आयोजित दुसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. मोहन केशव फडके हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व प्रा. दत्ता दंडगे उपस्थित होते. प्रा. डॉ. फडके लिखित ‘वैदिक मंत्रा फॉर द डिसिज फ्री लाइफ’ या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ”पॉलिटेक्निक, इंजिनियरींग, मेडिकल आणि लॉ हे सर्व शिक्षण मराठीत व्हावे यासाठी कार्य सुरू आहे. येत्या मार्चपासून यांची प्रश्नपत्रिका दोन भाषेत असेल. सुरूवातीलाच मराठी व इंग्रजी भाषेचे पर्याय दिले जाणार आहे. त्यातील एक भाषा निवडून त्या भाषेतच उत्तरे द्यावीत. या पद्धतीचा पहिला टप्पा पूर्णात्वास नेत आहोत. या धोरणात बारावीनंतर ४ वर्षांची पदवी असेल. यात ७० टक्के पाठ्यक्रम हा करियर संदर्भातील असेल. उर्वरित ३० टक्के पाठ्यक्रम योग, तत्वज्ञान, मेडिटेशन, खेळ व संगीत या सारख्या विषयांचा अंतर्भाव असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे पॉइंट हे त्याच्या डिजिटल बँकेत जमा होतील. जेव्हा विद्यार्थी हा विदेशात शिक्षणासाठी जाईल तेव्हा त्याच्या डिजिटल बँक खात्यातून ते पॉइंट तेथील विद्यापीठात जमा होतील. नवीन शिक्षण पद्धत घोकमपट्टीची नसून मानवाला परिपूर्ण करणारी असेल. जून २०३० मध्ये सर्वांना ही अनिवार्य असेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ”देव ही शक्ती आहे व्यक्ती नाही. शिक्षणाच्या माध्यमातूनच मानव व जगाला दिशा दाखविता येईल. तसेच जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी अध्यात्माला समजून घेणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरांचे सर्व सिद्धांत मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. अध्यात्म एक शास्त्र ते अंधश्रध्दा नाही. जगाला नवी दिशा देण्यासाठी नवीन शिक्षण पद्धत गरजेची आहे.”
यावेळी प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण, प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनंतर प्रा. दत्ता दंडगे यांनी आभार मानले.