मुंबई | राज्यात काही दिवस थंडीचे प्रमाण कमी आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पडल्याचे दिसते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते असा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात ठिकठिकाणी पावसाचे पुन्हा एकदा आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या आसपास हलका पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरणासहित अपेक्षित थंडीला मात्र कदाचित आठवडाभर अटकाव होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील २ दिवस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किमान तापमानात ४ तर कमाल तापमानात २ अंशांची वाढ जाणवू शकते. त्यामुळे सध्या असलेले दमट वातावरण तसेच पुढे २ दिवस जाणवेल, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.