पुणे | पुणे शहर व परिसरात सुमारे ८ लाख राजस्थानी समाज राहतो. व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने राजस्थानहून आलेल्या नागरिकांना राजस्थानला जाण्यासाठी पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वेगाडी दररोज सुरु करावी, अशी मागणी अखिल राजस्थानी समाज संघ, पुणे च्या वतीने करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांना गुरुवारी देण्यात आले आहे, अशी माहिती अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी दिली.
सध्या पुण्याहून जोधपूरला जाण्यासाठी आठवड्यातून एकच रेल्वे आहे. पुणे व परिसरातील राजस्थानी नागरिकांची संख्या लक्षात घेता आठवड्यातून एक रेल्वे पुरेशी नाही. परिणामी, जोधपुरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुणे ते जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करावी, अशी मागणी अखिल राजस्थानी समाज संघाकडून मंडल रेल प्रबंधक कार्यालय येथे निवेदन देऊन केली आहे. यावेळी राजस्थानी समाजाच्या ३६ विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आल्याचे ओमसिंह भाटी यांनी सांगितले.
राजस्थानी समाजाची मागणी मान्य न झाल्यास येत्या काळात धरणे आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा अखिल राजस्थानी समाज संघ पुणे चे सचिव जयप्रकाश पुरोहित यांनी दिला आहे.