पुणे | श्री सम्मेद शिखरजी प्रश्नासंदर्भात झारखंड सरकारने देशभरातील जैन समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी श्री सम्मेद शिखरजी संदर्भात अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आज सकल जैन संघ पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि त्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना जैन धर्मियांच्या याविषयीच्या भावना सांगितल्या. तसेच, तत्काळ यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी विनंती केली, अशी माहिती सकल जैन संघातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पुण्यातील सकल जैन समाजाच्या वतीने शरद पवार यांची ‘मोदी बाग’ या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने पवार यांना श्री सम्मेद शिखरजी संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्रसिंह यादव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळाने चर्चा करताना गुजरातमधील श्री क्षेत्र पालीताना व गिरनारजी या जैन धर्मियांच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांबाबत असलेल्या प्रश्नांकडेही पवार यांचे लक्ष वेधले.
सकल जैन समाजच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीसंदर्भात आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भातील माहिती शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.
सकल जैन समाज पुणे च्या शिष्टमंडळात अध्यक्ष अचल जैन, अभय छाजेड, मिलिंद फडे, हरीषभाई शाह, लक्ष्मीकांत खाबिया, नितीन जैन, निलेश शाह, भरत सुराणा, अरुण कटारिया, देवेंद्र बाकलीवाल, अक्षय जैन, पोपटलाल ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुरेंद्र गांधी, अॅड. योगेश पांडे उपस्थित होते.