बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
पुणे | दि पूना मर्चंट चेंबरचे मुखपत्र असलेल्या ‘वाणिज्य विश्व’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात करण्यात आला. यावेळी बीएमसीसीच्या दहा विद्यार्थ्यांना आणि दोन प्राध्यापकांना चेंबरच्या वतीने पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना, शहरातील मार्केटयार्डची जागा अपुरी पडत आहे, व्यापार वाढीसाठी नव्या जागी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे. शहराबाहेर काही जागा पाहिल्या आहेत त्यावर लवकर निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.
तसेच, पूर्वीच्या आठवणींना उजाळा देत, पूर्वी धान्य व्यापाऱ्यांचे व्यवहार नाना पेठेत चालायचे. मार्केटची जागा छोटी असल्यामुळे सध्याच्या जागेत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मी तेव्हा ठेवला, त्याला विरोध देखील झाला. मात्र संबंधित व्यापाऱ्यांना राजी करण्यात आम्ही यशस्वी झालो त्यामुळे व्यापार देखील अधिक पटींनी वाढला आणि नाना पेठेतील वाहतुकीची समस्याही सुटली.
त्याचबरोबर ‘वाणिज्य विश्व’बाबत बोलताना, आम्ही त्यावेळी बीएमसीसीचे विद्यार्थी. विठ्ठल मणियार यांच्यासह आम्हा तीन-चार जणांचा ग्रुप सर्वच क्षेत्रात सक्रिय होता. त्यामुळे आम्हाला ‘वाणिज्य विश्व’बाबत माहिती मिळत असे. या मासिकाचा व्यापारी वर्गाला खूप लाभ झाला आहे. तसेच मासिकाच्या तत्कालीन संपादकांनी वेळोवेळी सडेतोड भूमिका घेऊन राज्य सरकारला चुका दाखवून दिल्या आहेत. त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होतोय ही आनंदाची बाब आहे.
तर ‘व्यापाराचे विद्यापीठ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मी शिष्यवृत्तीची कल्पना मांडली होती. आपण ज्या संस्थेत शिकलो, तेथील विद्यार्थ्यांना मदत करणे ही त्यामागे भावना होती. दि पूना मर्चंट चेंबरने त्याची त्वरित अंमलबजावणी केली त्याबद्दल चेंबरचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी विठ्ठलशेठ मणियार, झी २४ तास या न्यूज चॅनलचे संपादक डॉ. निलेश खरे, उद्योजक फत्तेचंद रांका, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सहसचिव ईश्वर नहार, ‘वाणिज्य विश्व’चे संपादक प्रवीण चोरबेले, सहसंपादक आशीष दुगड, बीएमसीसीचे प्राचार्य जगदीश लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना, सचिव रायकुमार नहार यांनी चेंबर आणि ‘वाणिज्य विश्व’च्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख करत सर्वांचे आभार मानले. तर वाणिज्य विश्व’चे संपादक प्रवीण चोरबेले यांनी मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेऊन सर्व माजी संपादक, संपादक मंडळ आणि लेख मंडळींचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण करंदीकर यांनी तर ईश्वर नहार यांनी आभार मानले.
दरम्यान, स्टार्टअप वृद्धीसाठी बीएमसीसीमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी साईराज अहिवाळे, राहुल आधाळे, आदित्य गलगली, अनय देशपांडे, वैभवी चौधरी, मोक्षदा दोशी, आशुया शेटे, संस्कृती जैन यांना, तसेच प्रा. डॉ. राजश्री गोखले, प्रा. डॉ. शिल्पी लोकरे यांना २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
तर ‘वाणिज्य विश्व’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘व्यापारी मित्र’चे सहसंपादक सीए पुरुषोत्तमी शर्मा, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. संजय कंदलगावकर यांना ‘वाणिज्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘वाणिज्य विश्व’च्या जडणघडणीत उल्लेखनीय योगदान देणारे ॲड. सुभाष किवडे आणि दिलीप साळवेकर, शिष्यवृत्ती योजनेसाठी कै.रघुवीरशेठ गोयल यांच्या स्मरणार्थ विशेष योगदान देणारे त्यांचे सुपुत्र शिवकुमार, अशोक आणि विनोद गोयल, कार्यक्रमाचे प्रायोजक आणि चेंबरचे हितचिंतक फत्तेचंद रांका यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रकाशन चालवणे खूप अवघड काम आहे ते ५० वर्षे सातत्याने चालवणे तर अशक्यच. त्यामुळे सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या ‘वाणिज्य विश्व’चे मला खूप कौतुक आहे. ‘वाणिज्य विश्वच्या सर्व टीमचे आणि चेंबरचे डॉ. निलेश खरे यांनी कौतुक केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वाणिज्य विश्व’ च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. ‘वाणिज्य विश्व’चा वाचक वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरचे पदाधिकारी आणि मासिकाच्या संपादक मंडळाचे देखील त्यांनी यामार्फत अभिनंदन केले आहे.
शरद पवार यांचे व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य लाभते, ते आमचे आधारस्तंभ आहेत. पुण्याचा व्यापार वाढला पाहिजे यासाठी ते सदैव आग्रही आहेत. आमच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव मदत करतात. ईकॉमर्समुळे, पारंपरिक व्यापारापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हा व्यापार टिकलाच पाहिजे. त्यासाठी व्यापाऱ्यांच्या अडचणी सुटायला हव्यात. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा बाजार समित्यांच्या भुसार विभागांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल येतच नाही. त्यामुळे तेथे एक टक्का सेसची अंमलबजावणी करू नये, तसेच बाजार नियमन करू नये अशी आमची आग्रहाची मागणी आहे.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर