विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्याचं आयोजन केलं. ४ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या दौऱ्याचा १३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये नियोजित समारोप होणार होता. पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून १० ऑगस्ट रोजीच छत्रपती संभाजीनगर इथं त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सोलापुरात बोलताना राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर जी भूमिका घेतली त्यामुळं मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी राज ठाकरेंना विरोध दर्शविला. मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळेच राज ठाकरेंनी नियोजित दौरा आटोपता घेतला का? ४ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या मराठवाडा दौऱ्यात नेमकं काय काय घडलं? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
४ ऑगस्ट रोजी राज ठाकरे सोलापुरात आले. सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांना भेटीची वेळ मागितली. मात्र, आंदोलकांना वेळ नाकारण्यात आली. राज ठाकरे पुढे ५ ऑगस्ट रोजी धाराशिवमध्ये दाखल झाले. धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारायला सुरुवात केली. बराच वाद झाल्यानंतर शेवटी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली. मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारले. तुम्ही आरक्षणाबाबत आज वक्तव्य केलं. मात्र आत्तापर्यंत आरक्षणासाठी आमचे 400 बांधव मृत झाले. आण्णासाहेब पाटलांपासून आत्तापर्यंत अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. आम्हाला कोण भडकवत नाही. आज आमचा समाज कोणत्या अवस्थेत जगतोय आम्हाला माहिती आहे, अशा परिस्थितीत तुम्ही माथी भडकवली जातात, किंवा आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य करणं चुकीचं होतं. आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून काय करणार आहात? तुम्ही सध्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार आहात? असे प्रश्न विचारले. यावेळी राज ठाकरे जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करतो असं म्हणाले. यावेळी ते थांबलेल्या हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याठिकाणी बोलवलेली नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली होती.