मुंबई | शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा नुकताच पार पडला. याच दसरा मेळाव्यावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती. त्यावरूनच नारायण राणे यांनी ‘काय म्हणाला तो, अमित शहा म्हणून या राज्यातून त्या राज्यात जातात. तुम्ही ३७० हटवलं का काश्मीरमधून? देशातील लोकांना कोण सांभाळतंय थोडी तरी मर्यादा बाळगा’, असे ते म्हणाले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. नारायण राणे यांनी मेळाव्यावरूनही भाष्य केले. ते म्हणाले, ‘जो मेळावा झाला त्यात फक्त पोकळ वल्गना केल्या गेल्या. शिळ्या कढीला उत याशिवाय यामध्ये काहीही नव्हतं. 2019 च्या निवडणुकीत मोदींचं नाव आणि फोटो लावून खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक लढली. मोदींच्या नावावर निवडून आले आणि त्यांच्यावर टीका करता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातील भाषणादरम्यानच डॉक्टरांनी आपल्याला वाकण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही, असं म्हटलं होतं. याच संदर्भात त्यांनी ‘वाकायला पण डॉक्टर लागतो मग तू काय काम करणार?’ असा सवालही त्यांनी केला.
श्रीकांत शिंदे यांच्या नातवावरूनही टीका
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचे पुत्र श्रीकांत आणि नातवाचं नावही घेतलं होतं. त्यावरून ‘दीड वर्षाचा नातू नगरसेवक लाज नाही वाटतं तुला?’, असेही ते म्हणाले.