मुंबई | एसटीचे विलनीकरण राज्य सरकारमध्ये करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा महिने आंदोलन केले होते. त्या काळात काही आंदोलक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी हल्ला चढवला होता. त्यानंतर आंदोलनात सहभागी असलेल्या 118 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. पण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) या निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेत पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारचा निर्णय आहे. सरकारने ठरवावं’, असे ते म्हणाले.
राज्यातील शिंदे सरकारची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्येच शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केलेल्या 118 निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी कोणावरही टीका न करता तो सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावे, असे म्हणत त्यावर अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीसाठी जोर धरला होता. त्यावेळी त्यांनी जवळपास सहा महिने एसटी सेवा बंद पाडली होती. तसेच याच काळात संतप्त आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.