यवतमाळ | वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील असोला येथे नागरी सत्कार कार्यक्रमासाठी आलेले शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी वाशिममधील जनतेला माझ्यामागे अनेकजण हात धुवून लागले आहेत, तुम्ही मला मदत करा अशी थेट विनवणी केली आहे.
मी यवतमाळमध्ये गेल्या 25 वर्षांपासून रुग्णांसाठी मदतीचे काम मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला मदत करा, तुम्ही जरी मला मतदान करत नाहीत, पण तुमचे नातेवाईक हे माझ्या मतदारसंघात राहतात, त्यांना तुम्ही फोन करून नेहमी सांगता. यंदाही मला निवडून आणण्यासाठी अशीच मदत राहुद्या. विशेष म्हणजे, अनेकजण माझ्यामागे हात धुवून लागले आहेत, असेही संजय राठोड यांनी म्हटले आहे.
राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते सध्या शिंदे गटात आहेत. शिंदे गटाकडून त्यांना पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करण्यात आले. ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, जनतेची सहानुभूती काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळत आहे. त्यामुळे, शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येते. म्हणूनच कि काय त्यांनी जनतेकडे अशा प्रकारे विनंती केली आहे. मात्र लोक त्यांचे हे बोलणे ऐकतील का? ते येणारा काळचं ठरवेल.