मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या (Andheri East By Election) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा राजीनामा महापालिका प्रशासनाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लटके विरूद्ध भाजपच्या मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या. ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार, त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाकडे दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून दिरंगाई केली जात होती. याच निर्णयाविरोधात ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या निकालानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, हायकोर्टानेच राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिल्याने ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत लटके विरुद्ध पटेल यांच्यात सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.