मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली. लटके उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे सासरे आणि रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले. ‘ऋतुजा लटके या रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या नावासाठी उभ्या आहेत. पैशांसाठी नाही. त्यांना जनतेनं उभं केलं आहे. आता सर्वकाही जनतेच्या हातात आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवसेना पक्षफुटीनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि भाजप हे पोटनिवडणुकीच्या निमित्त आमनेसामने आले आहेत. ऋतुजा लटके यांनी शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यादरम्यान त्यांचे सासरे कोंदिराम लटके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये ते म्हणाले, ‘ऋतुजा लटके ज्याच्या नावासाठी उभ्या आहेत. जनतेनंच त्यांना उभं केलं. आता सगळं जनतेच्या हातात आहे. त्यामुळे पुढे काय करायचं, ते तुम्ही बघा. त्या रमेश लटके यांच्याप्रमाणेच एकदम डायरेक्ट काम करणार आहेत. त्याचा हिशोबच नाही. तिच्या पतीने जनतेसाठी जे काही केलं, ते तिनेही करावं’. तसेच ऋतुजा लटके आपल्या पतीप्रमाणे एकदम चांगल्याप्रकारे काम करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महापालिकेत लिपिक पदावर असलेल्या ऋतुजा लटके यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास दिंरगाई करण्यात येत होती. त्यामुळे ऋतुजा लटके निवडणूक लढवणार का? याबाबत साशंकता होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर पालिकेने राजीनामा स्वीकारला. त्यानंतर आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.