मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट-शिंदे गट वेगळे झाले. त्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटातील अनेक नेते फोडले. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांना खेचून घेतले आहे. त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्तीही केली गेली.
सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि युती सरकारला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर शिंदे गटाने लगेचच त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी दिली. यापूर्वीही शिंदे गटाने ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचून घेतले आहे. पण ठाकरे गटापलीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला आपल्या गटात सामिल करून घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे शिंदे गटाने खेचून घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय राजकीय डावपेच खेळले जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.